
अमरावती, 05 एप्रिल (हिं.स.)।
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील अभ्यासक्रमावरून सध्या नवा वाद उफाळून आला आहे. बीए मराठीच्या द्वितीय वर्षात अभ्यासासाठी असलेली लेखक पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्यात आली आहे.
ही कादंबरी भाजप सरकारवर टीका करणारी असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.
करोना काळातील काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर आधारित या कादंबरीतील काही अंश हे सत्ताधारी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रतिकूल भाष्य करणारे असल्याचा दावा काही प्राध्यापकांनी केला होता. ९ डिसेंबर रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत काही सदस्यांनी या कादंबरीवर आक्षेप घेतले, त्यानंतर कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी ही कादंबरी अभ्यासमंडळाकडे पुनर्विचार करण्यास पाठवली. अभ्यासमंडळात या कांदबरीवर पुनर्विचार झाल्यावर या कादंबरीत काहीही गैर अथवा आक्षेपार्ह नाही, असा निर्णय घेऊन ही कादंबरी कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती मराठी विभागाच्या प्रमुख, समीक्षक आणि संशोधक डॉ. मोना चिमोटे यांनी दिली. २ एप्रिलला विद्या परिषदेच्या बैठकीत कादंबरीवर पुन्हा आक्षेप घेण्यात आले. एकमताने निर्णय होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुलगुरूंनी त्यावर मतदान घेण्याचे ठरवले. मतदानामध्ये २३ विरूद्ध ८ अशा बहुमताने ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्यात आली.
या कादंबरीवर आक्षेप घेणारे तीन पानांचे पत्र विद्या परिषदेच्या एका महिला सदस्याने कुलसचिवांना दिले होते. मोदी सरकारने करोना लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करते, तसेच या काळातील चुकीचे चित्रण करते, असा आक्षेप या पत्रातून घेण्यात आला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या कादंबरीवर आक्षेप घेणारे पत्र कुलसचिवांना दिले होते, अशी माहिती मिळाली आहे. आता ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीऐवजी लेखक उद्धव शेळके लिखित ‘धग’ ही कादंबरी बीए भाग-२च्या मराठी अभ्यासक्रमासाठी उन्हाळी २०२६ परीक्षेपासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी