


मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.) - स्वातंत्र्यचळवळीतील सशस्त्र क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानातील काळकोठडीत डांबले. तिथे त्यांच्यासह अनेक क्रांतिकारकांना कोलू फिरवताना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागल्या. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याचा काही अंशी प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने 'अनुभव कोल्हू का, सम्मान क्रांतिवीरों का' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना क्रांतिकारकांनी भोगलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचा अंशतः अनुभव घेण्यात आला. प्रत्यक्ष कोलू फिरवताना सहभागी नागरिकांना बेड्या घालून कोलू फिरवण्यात आला. त्याचवेळी कोलूमध्ये खोबऱ्याच्या वाट्या टाकल्या जात असून त्यातून प्रत्यक्ष तेल निघत आहे. सर्व वयोगटातील नागरिक याचा अनुभव घेत आहेत.
४ आणि ५ एप्रिल हे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनुभव घेण्यात आला. शनिवार, ४ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी स्वतः कोलू फिरवून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सिद्ध विद्या आणि सेबीचे उपमहाव्यवस्थापक दुर्गेश ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी यावेळी उपस्थित होते.
क्रांतिकारकांचे पुन्हा झाले स्मरण
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ब्रिटिशांनी त्यांचा अनन्वित अत्याचार केला. यासाठी हजारो क्रांतीकारकांना अंदमानच्या सेल्युलर कारागृहात ठेवले जात. तिथे त्यांच्यावर अमानवी अत्याचार केले जात असत. याच अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ठेवण्यात आले होते. तिथे त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. कारागृहात बैलाच्या जागी वीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतीकारकांना कोलूला जुंपले जायचे. आठ तासांत तीस पाऊंड अर्थात साडेतेरा ते चौदा लिटर तेल काढावे लागत असे. तेलाचे सांगितलेले प्रमाण पूर्ण होईपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांची कोलू फिरवण्यापासून सुटका होत नसे. जर कोलू चालवण्याचे काम पूर्ण केले नाही तर शिक्षा दिली जायची.
अनन्वित छळ केला जायचा. या छळाला कंटाळून इंदुभूषण राय यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आत्महत्या केली. उल्हासकर दत्त यांच्यासारख्या अनेक वीरांचे मानसिक संतुलन ढासळले. असे सगळे असतानाही स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारने मात्र 'दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल' असे बिंबवून स्वातंत्र्यचळवळीत हजारो क्रांतिकारकांचे बलिदान झाकून ठेवले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील 'अनुभव कोल्हू का, सम्मान क्रांतिवीरों का' हा कार्यक्रमामुळे सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्याकरता त्यांनी सहन केलेल्या यातना पुन्हा समोर येत आहेत. अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किती यातना सहन केल्या असतील, त्याची प्रचिती या कार्यक्रमामुळे आल्याची भावना या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली. आपल्याला कायम चरखा लक्षात राहतो, पण वीर सावरकरांनी कोलू फिरवत कसे दिवस घालवले असतील, हे आपण विसरतो. अनन्वित छळ सहन केल्यानंतरही क्रांतिकारकांनी राष्ट्रभक्तीची भावना तसूभरही ढळू दिली नाही, ही खूप कौतुकास्पद गोष्ट असल्याचेही ॲड. सिद्ध विद्या यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात जणू अंदमानच अवतरल्याचा अनुभव यावेळी उपस्थितांनी घेतला. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी