
लातूर, 05 एप्रिल (हिं.स.)।
औसा तालुक्यातील शिवली या पवित्र भूमीत नवसाला पावणाऱ्या श्री हनुमान यात्रेला यंदा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील हे जागृत देवस्थान आज हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले असून यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी उसळलेली दिसत आहे. औसा तालुक्यातील शिवली येथील श्री हनुमान मंदिराची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे येथे गेल्या शंभर-दोनशे वर्षांपासून अखंड तेवत असलेला दिवा. काळाच्या ओघात अनेक बदल झाले, पण हा दिवा आजही तसाच अखंड प्रज्वलित आहे. या दिव्यामुळेच या यात्रेला एक वेगळीच पवित्रता आणि ख्याती लाभली आहे. नवसाला पावणारा हनुमान म्हणून या देवस्थानाची ख्याती सर्वदूर पसरली असून भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी
मोठ्या श्रद्धेने येथे येतात. दरवर्षी हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या शनिवारपासून यात्रेला सुरुवात होते. परंपरेनुसार, पहाटे गावातील भाविक आपल्या घरापासून मंदिरापर्यंत दंडवत घालत येतात. पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत दही-दुधाचा अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर श्री हनुमानाच्या मूर्तीला सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सजवून महापूजा केली जाते. दुपारनंतर गावातील तसेच सासरी गेलेल्या महिला आपल्या माहेरच्या आठवणींनी भारावून वाजत-गाजत मंदिराकडे येतात आणि लोटांगण घालून आपल्या श्रद्धेची प्रचिती देतात. दिवसभर मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला असतो, आणि वातावरणात भक्तीभाव, नामस्मरण आणि आनंदाची लहर पसरलेली ते. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी पहाटे २ वाजल्यापासून दंडवत, सकाळी अभिषेक, अलंकार व महापूजा, सायंकाळी प्रसाद वितरण आणि रात्री हरिजागर व भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ एप्रिल रोजी भव्य भारूड कार्यक्रम, ६ एप्रिल रोजी मल्लांचा कुस्तीचा थरार आणि सायंकाळी भक्तिमय श्री लक्ष्मण शक्ती सोहळा पार पडणार आहे. तर ७ एप्रिल रोजी श्रीरामायणाची महाआरती व सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis