
नांदेड, 05 एप्रिल (हिं.स.)।
आखाती देशातील युध्दामुळे सर्वत्र गॅस व पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. हे सत्य असले तरी, पेट्रोलपंपावरील रांगा कमी झाल्या आहेत. मात्र, घरगुती गॅसच्या कृत्रिम टंचाईच्या झळा वरचेवर तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या पेट्रोल टंचाईचा प्रश्न मिटला मात्र, गॅस सिलिंडर टंचाईचा प्रश्न मिटत नसल्याने सर्वसामान्यांची फरपट सुरूच आहे.
नांदेड जिल्ह्यात इंडेन, हिंदुस्थान व भारत पेट्रोल या तीन प्रमुख कंपन्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरचे जवळपास साडेसात लाख ग्राहक आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी व जिल्हा पुरवठा डॉ. जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील वितरकांची बैठक घेऊन घरगुती गॅस ग्राहकांना घरपोच सिलिडर द्या अशा सूचना दिल्या मात्र, या सूचनांना वितरकांनी केराची टोपली
दाखविल्याचे चित्र असून, आजही ग्राहक वितरकांच्या गोडाऊनजवळ तासन्तास लाईन लावून बसत आहेत. व्यावसायिकाकडून घरगुती गॅससिलिंडरचा सर्रास वापर होत असून, यावर आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने तयार केलेली पथके कुठे आहेत असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पथकांनी किती तपासण्या केल्या आणि किती कारवाया केल्या याबाबतची माहिती घेतल्यास जिल्ह्यात केवळ पाच ते सहा ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याची बाब पुढे आली आहे.
मुदत संपल्यानंतर गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी कंपन्यांचा ऑनलाईन क्रमांक (ओटीपी) येत नाही काही दिवस प्रयत्न केल्यानंतर बुकिंग होऊन ओटीपी आला तरी ग्राहकांला सिलिंडर घरपोच मिळत नाही. वितरकाकडे गेले तर ते आपला नंबर वेटिंगवर आहे. आधीचे ग्राहक झाल्यानंतर आपल्याला १० ते १५ दिवसांनंतर सिलिंडर येणार असे सांगत आहेत. त्यामुळे वेटिंगचा फॉर्म्युला हा कुणाच्या सोयीचा आहे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅस सिलिंडर असल्याचा दावा होत असला तर मग गॅस बुकिंग होण्यास काय अडचण आहे. बुकिंग झाली तर गॅस ग्राहकांना घरापर्यंत का मिळत नाही. असा ही प्रश्न या निमित्ताने ग्राहकांतून विचारला जात आहे.
जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई भासत आहे. युध्द थांबत नसल्याने त्याची तीव्रता अधिक भासणार आहे. त्यामुळे अनेकजण गॅस सिलिंडरचा आवश्यकतेपेक्षा जास्त साठा करून ठेवत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis