रायगड - सहाण-रोहा रस्त्याच्या कामावरून शिवसेनेचा इशारा
शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांचा इशारा
Shiv Sena warns against Sahan-Roha road work


रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। सहाण ते रोहा या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला गती न आल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी यांनी संबंधित विभागाला दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या सहाण-रोहा रस्त्याच्या कामाला गोंधळी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरुवात झाली असली, तरी ठेकेदाराकडून कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे गोंधळी यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी अलिबाग-रोहा मार्गावरील पूल रात्रीच्या वेळी कोसळल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. गोंधळी यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून दोन दिवसांत पूल उभारून घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली. मात्र, सहाण ते रोहा दरम्यानचा मुख्य रस्ता अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे.

या कामासाठी नियुक्त ठेकेदाराने ज्या ठिकाणी खर्च कमी येतो, त्या भागातच काम करून बिल उचलल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ज्या भागात अधिक दुरुस्ती आवश्यक आहे, त्या ठिकाणी काम प्रलंबित ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मागील तीन वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आणि माध्यमांनीही वारंवार आवाज उठविला आहे.

दरम्यान, गोंधळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात, संबंधित कंपनीकडून कामात होत असलेल्या विलंबाबाबत गंभीर आक्षेप नोंदवला आहे. तसेच नवघर पुलाच्या कामालाही अद्याप सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गोंधळी यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande