
सोलापूर, 05 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यानंतर शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत सत्तेत गेले. मात्र, सत्तेत जाऊन एकही पद न मिळाल्याने राष्ट्रवादी बाहेर पडण्याच्या तयारीत असून, त्याचा निर्णय रविवार, 12 एप्रिलला होणार आहे.
जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आल्याने भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही सभापती भाजपचे केले आहेत. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नाराज झाले असून, ते सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षात बसण्याची शक्यता आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर चार विषय समित्यांमधील एका विषय समित्यांवर पक्षातील सदस्यांना संधी मिळेल, अशी आशा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्यक्त केली होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या चार सदस्यांनाच सभापतीपदाची संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील सदस्यांमध्ये धुसफूस सुरू झाली असून, वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड