
नवी मुंबई, 05 एप्रिल (हिं.स.)। राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच नवी मुंबईतही तसाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाच्या भोंदूबाबाने काळी जादू काढून देण्याच्या बहाण्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दोन महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणी भोंदूबाबाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगत अल्लाचे महत्त्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करत असे. गोड बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून विशेषतः महिलांना फसवत असे. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि वैवाहिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन देत तो लोकांना भेटण्यासाठी बोलवत होता. अशाच प्रकारे त्याने खालापूर येथे एका विवाहित महिलेला निर्जन फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच सांताक्रूझ येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दोन्ही प्रकरणात बाबाजान वर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
महिलांना “तुमच्यावरची काळी जादू काढून देतो” असे सांगून तो त्यांना एकट्याने बोलवत असे. मध्यरात्री पूजा करण्याच्या नावाखाली महिलांना कपडे काढण्यास भाग पाडले जात असे. विरोध केल्यास जादूटोण्याची भीती दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होता. खालापूरप्रमाणेच कळंबोली येथेही तो अशाच प्रकारे महिलांना भेटत होता. आपल्या समस्या सुटतील या आशेने अनेक लोक त्याच्याकडे जात होते. मात्र वाढत्या गर्दीमुळे कळंबोलीतील सोसायटीतील सदस्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते.
गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपीने कुटुंबासह पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. केवळ महिलाच नव्हे तर अनेक पुरुषही त्याच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचेही उघड झाले आहे. सध्या दोन महिलांनी तक्रार दिली असली तरी आणखी अनेक महिला त्याच्या अत्याचाराच्या शिकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात पीडित महिलांना पुढे येण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्व धर्मांमध्ये भोंदूबाबा ही एक सामाजिक कीड बनली असून अशा लोकांना कोणत्याही राजकीय पक्षाने संरक्षण देऊ नये, अशी मागणी मंडळाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule