हिंगोलीत अमृत परिवार सर्वेक्षण अभियान 8 एप्रिलपासून सुरु
छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या विविध योजना लक्ष्यित गटातील जास्
हिंगोलीत अमृत परिवार सर्वेक्षण अभियान 8 एप्रिलपासून सुरु


छत्रपती संभाजीनगर, 06 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या विविध योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अमृत संस्थेमार्फत संपूर्ण राज्यात सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही संस्था किंवा महामंडळांचा लाभ मिळत नाही आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्था कार्य करते.

अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटात ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुंघर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य आदी जातींचा समावेश आहे. तसेच विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी अशा विविध घटकांसाठी संस्थेकडून विविध योजना राबविल्या जातात.

या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्ष्यित गटातील कुटुंबांशी प्रत्यक्ष संपर्क साधून माहिती संकलित करणार आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना व मंडळांकडूनही माहिती घेण्यात येणार आहे. संबंधित जातींमधील व्यक्ती, संस्था, संघटना व मंडळांनी या कालावधीत अमृत प्रतिनिधींशी संपर्क साधून आपल्या परिवाराची व समाजाची माहिती नोंदवावी तसेच विविध योजनांची माहिती घ्यावी. अधिक माहितीसाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे (मो. 7391065471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृत संस्थेकडे आपल्या परिवाराची नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande