
येवला, 06 एप्रिल (हिं.स.)
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे येवला मतदारसंघातील येवला तालुक्यातील अंदरसूल (मुले) व पाटोदा तसेच निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील तीन जिल्हा परिषद शाळा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत निवडण्यात आल्या आहेत.
या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा मंत्री भुजबळांचा नेहमीचा आग्रह आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे या शाळांना सुसज्ज इमारती, अत्याधुनिक संगणक लॅब, डिजिटल क्लासरूमसह उत्तम शैक्षणिक वातावरण मिळणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ आणि क्रीडा क्षेत्रासाठी ‘क्रीडा प्रबोधिनी’सारख्या सुविधा विद्यार्थ्यांच्या प्रगतीस मोठा हातभार लावतील.
यासंदर्भात माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली असून, या आदर्श शाळांमुळे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. -------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV