
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)।
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील सहभागी लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करून त्यांचे तात्काळ राजीनामे घ्यावेत, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 06) सेलू शहरातील क्रांतीचौक परिसरात आंदोलन करण्यात आले. भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या शोषणाला महिला व सामान्य नागरिक बळी पडल्या आहेत. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व अधिकारी सहभागी असल्याचे सांगत संविधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी आपल्या जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. या अनुषंगाने सोमवारी सेलू शहरातील क्रांतीचौक परिसरात पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कॉ. रामकृष्ण शेरे, कॉ. उद्धव पौळ, रामेश्वर पौळ, कॉ दत्तूसिंग ठाकूर, कॉ. सुभाष शहाने, कॉ. ज्ञानेश्वर पौळ आदींच्या शिष्टमंडळाने सेलू तहसीलदारांना आपल्या मागण्या संदर्भातील निवेदन सादर केले. त्याद्वारे, भोंदूबाबा अशोक खरात व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरावी, तसेच या प्रकरणातील 39 लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करून त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या संबंधित चित्रफिती तात्काळ हटवाव्यात, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा, जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच बुवाबाजी, ज्योतिष, तंत्र-मंत्र व अंधश्रद्धा पसरविणार्या जाहिरातींवर बंदी घालावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis