गोरेगाव पूर्व दिंडोशीतील संघर्षानंतर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत घरांवर जेसीबीचा बडगा
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी संतोष नगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण राड्यानंतर मोठी घडामोड समोर आली असून, या प्रकरणातील दंगेखोरांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प
BMC Takes Strict Action Following Clashes Dindoshi Goregaon East


मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील दिंडोशी संतोष नगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण राड्यानंतर मोठी घडामोड समोर आली असून, या प्रकरणातील दंगेखोरांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने दिंडोशी संतोष नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई सुरू केली आहे. या घरांबाबत पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काल ५ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास मरियम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान संतोष नगर परिसरात अचानक वाद निर्माण झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या वादाचे रूपांतर लवकरच तुफान हाणामारीत झाले. या घटनेत तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार संतोष नगरमधील ज्योती बार अँड रेस्टॉरंट जवळ घडल्याचे समजते. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मध्यरात्री आठ जणांना अटक केली आहे.

या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी पोलिस आणि बीएमसी प्रशासनाकडे मागणी करत हल्ला करणाऱ्या आरोपींच्या अनधिकृत घरांवर आणि दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, शोभायात्रेदरम्यान जोरात वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांवरून दुसऱ्या गटाने आक्षेप घेतल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर काही जणांनी तलवारी आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

याच पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत, ही कारवाई केवळ दाखवण्यासाठी केली जात असेल तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी पालिकेची कारवाई योग्य असल्याचे सांगितले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्याच ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा सल्ला दिला आहे. तरीही कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने परिसरात तणाव वाढलेला आहे.

याच ठिकाणी आज संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण घटनाक्रमामुळे दिंडोशी संतोष नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण कायम असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande