
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)।
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) जवानांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ आणि ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. परभणी रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल–नरसापूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली असताना एक प्रवासी जनरल डब्यात चढताना अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. ही घटना लक्षात येताच ड्युटीवर असलेले हेड कॉन्स्टेबल मोगरे पद्माकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत त्या प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली. संबंधित प्रवासी शेख मोहम्मद असून ते परभणी ते नांदेड असा प्रवास करत होते. दरम्यान, दुसऱ्या घटनेत ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत हरवलेली पर्स प्रवाशाला परत करण्यात आली. पुणे येथील सौ. अविषा या आपल्या पतीसोबत गाडी क्रमांक १७६२९ हडपसर एक्सप्रेसने प्रवास करत असताना छत्रपती संभाजीनगर येथे उतरताना त्यांची पर्स गाडीतच राहिली. याबाबत त्यांनी रेल्वे हेल्पलाईन १३९ वर तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत सेलू रेल्वे स्थानकावर हेड कॉन्स्टेबल शिवानंद मांते यांनी संबंधित डब्याची तपासणी करून पर्स शोधून काढली. त्यानंतर प्रवाशाशी संपर्क साधून पर्स RPF चौकी, सेलू येथे सुरक्षितपणे परत देण्यात आली. या पर्समध्ये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँकेची डेबिट कार्डे होती. या दोन्ही घटनांमधून RPF कर्मचाऱ्यांची सतर्कता, तत्परता आणि प्रवाशांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित होते. नांदेड विभागाने या कामगिरीचे कौतुक करत प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देण्याचा आपला निर्धार पुन्हा अधोरेखित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis