
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.) : आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मौजे आरी येथे गतवर्षी उद्भवलेल्या वादाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी आज, सोमवारी शिरूर अनंतपाळ येथील पंचायत समिती कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत पार पडलेल्या या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, तहसीलदार यादव, गटविकास अधिकारी वरंडेकर, पोलीस निरीक्षक भंडे, ग्रामसेवक एकुरके यांच्यासह मौजे आरी येथील दोन्ही गटांतील समाज बांधव, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवर्षी आंबेडकर जयंती उत्सवावेळी झेंडा लावण्याच्या ठिकाणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादामुळे गावातील शांतता आणि सामाजिक ऐक्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव शांततेत आणि सलोख्याने पार पडावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली.
बैठकीदरम्यान दोन्ही गटांच्या प्रतिनिधींना आपापले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. प्रशासनाने दोन्ही बाजूंचे मुद्दे संयमाने आणि निष्पक्षपणे ऐकून घेत सखोल आढावा घेतला. परस्पर संवाद आणि समन्वयातून गैरसमज दूर करून वादाचे मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांनी मार्गदर्शन करताना गावातील शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. अफवा, गैरसमज किंवा उत्तेजनात्मक कृतींना बळी न पडता संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार व इतर मान्यवरांनीही सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत गावातील परंपरा जपत सण-उत्सव एकत्र साजरे करण्याचे आवाहन केले.
सखोल चर्चेनंतर दोन्ही गटांनी परस्पर सहमतीने वाद मिटवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी आंबेडकर जयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने समाजमंदिरात सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या बैठकीमुळे मौजे आरी गावात सलोखा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संभाव्य तणाव पूर्णतः निवळला आहे. आगामी उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येणार असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
या शांतता बैठकीमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदाचा आंबेडकर जयंती उत्सव शांततेत, आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis