
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)। दिशा अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील चार दिव्यांग शाळांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दलचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले.
या अभियानाअंतर्गत मतिमंद प्रवर्गातील लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडूरंग निवासी मतिमंद विद्यालय तसेच चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय या चार शाळांचा समावेश आहे. वर्षभरात अभ्यासक्रम व अध्यापनात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे या शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम, भरत देवकते, शिवप्रसाद भंडारे आणि पंडित लव्हरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजू गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे तसेच दिशा अभियानाचे विभागीय समन्वयक साजिद मुल्ला उपस्थित होते.
अनेक निकषांवर शाळांची निवड
दिशा अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते. यामध्ये शालेय वेळापत्रकाचे नियोजन, शिक्षक व विद्यार्थी पुस्तिकांचा वापर, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी उपयोग तसेच बहुउद्देशीय अध्यापन पद्धती यांचा समावेश होता. या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे लातूर जिल्ह्यातील या चार शाळा पात्र ठरल्या असून त्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis