
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३८ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.
पतसंस्थेची स्थापना २०१८ साली झाली. पतसंस्थाचा ३१ मार्च २०२६ अखेर एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांपर्यंत पोहोचला आहे. ठेवी २३ कोटी ८९ लाख, कर्ज वितरण १६ कोटी २८ लाख आणि गुंतवणूक ९ कोटी ४४ लाखाची झाली आहे. वसुली ९७.२० टक्के, नेट एनपीए १.८४ टक्के आहे. खेळते भांडवल २४.१७ टक्क्यांनी, स्वनिधी २१.४७ टक्क्यांनी, तर ठेवी २५.०३ टक्क्यांनी वाढल्या. कर्ज वितरण ३२.५८ टक्क्यांनी, गुंतवणूक ११.९१ टक्क्यांनी, तर निव्वळ नफा १७.९६ टक्क्यांनी वाढल्याचे श्री. पावरी यांनी सांगितले. सात वर्षांत संस्थेने सातत्याने वर्धिष्णू आर्थिक वाटचाल करत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही ते म्हणाले. स्पर्धात्मक आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीतही संस्था आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा जपत पुढे जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाखा विस्तार, आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत संस्था सर्वांना विश्वासार्ह आर्थिक सेवा देत आहे, असे अध्यक्षांनी नमूद केले.
प्रत्येक सभासदाचे, प्रत्येक ठेवीदाराचे, प्रत्येक कर्मचाऱ्याचे आणि प्रत्येक सहकाऱ्याचे निःस्वार्थ सहकार्य पतसंस्थेला प्रगतिपथावर नेत असल्याचे श्री. पावरी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी