उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन; 65 संघटनांचा पाठिंबा
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ‘उदगीर जिल्हा निर्मिती कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागण
उदगीर


लातूर, 06 एप्रिल (हिं.स.)उदगीर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी ‘उदगीर जिल्हा निर्मिती कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनासोबत उदगीर शहरातील सुमारे 65 विविध सामाजिक संघटनांच्या लेटरहेडवरील समर्थन पत्रे जोडण्यात आली आहेत. तसेच शहरातील 400 पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या असल्याने या मागणीला व्यापक लोकसमर्थन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, लातूर जिल्ह्याचे मुख्यालय दूर असल्यामुळे देवरी, जळकोट, अहमदपूर आदी तालुक्यांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी 65 ते 85 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत असून सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उदगीर हे आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगाने विकसित होत असलेले शहर असून, स्वतंत्र जिल्हा निर्माण झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास कृती समितीने व्यक्त केला आहे.

दरम्यान, जिल्हा निर्मितीसाठी पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी 20 एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयोजक सुरेश पाटील नेत्रगावकर व मोतीलाल डोईजोडे यांनी दिली. शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande