
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)। बारामतीत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, अर्ज दाखल करण्याआधी राष्ट्रावादी काँग्रेसने मेळाव्याचं आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांचीही उपस्थिती होती. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या मेळाव्यात बोलताना भावूक झाले.
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोनंतर खासदार शरद पवार यांचा फोटो होता. शरद पवार पक्षाच्या दुसऱ्या कोणत्याच नेत्याचा फोटो त्यावर नव्हता. महायुतीच्या नेत्यांसोबत शरद पवार यांचा फोटो लावल्यानं चर्चांना उधाण आलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा होत आहेत.
बॅनरवर शरद पवारांच्या फोटोची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अनुपस्थितीचीही झाली. सुनेत्रा पवार यांच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात त्या अनुपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या रूपाली चाकणकर यांनी कार्यक्रमाला येणं का टाळलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांना द्यावा लागला. यामुळे रुपाली चाकणकर नाराज असल्याचंही म्हटलं जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु