एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडून नवी मुंबईत जीवनरक्षक कसरतींचे धडे
ठाणे, 06 एप्रिल (हिं.स.)। कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, पण पूर्वतयारी असेल तर होणारी हानी नक्कीच टाळता येते, याच उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत ''परिचय सराव कार्यक
NDRF SDRF Conduct Life Saving Drills Navi Mumbai


ठाणे, 06 एप्रिल (हिं.स.)। कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, पण पूर्वतयारी असेल तर होणारी हानी नक्कीच टाळता येते, याच उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यात १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत 'परिचय सराव कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांनी विविध आपत्तींचा सामना करण्याचे थरारक प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.

ही विशेष मोहीम ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन उत्तम व्हावे यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ यांच्या समन्वयातून हे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रशिक्षणात आपत्ती व्यवस्थापनातील बारकावे शिकविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विविध आपत्ती: पूर, आग, भूकंप आणि रस्ते अपघाताच्या वेळी कशा प्रकारे तातडीने प्रतिसाद द्यावा, जीवनरक्षक कौशल्ये: जखमींना तातडीने मिळणारे प्रथमोपचार, सी.पी.आर. देण्याची शास्त्रीय पद्धत आणि विविध प्रकारचे बँडेज बांधण्याचे कौशल्य, टाकाऊतून टिकाऊ सुरक्षा: महागड्या साधनांची वाट न पाहता घरातील टाकाऊ वस्तूंपासून सुरक्षा साधने कशी तयार करावीत आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण या विषयांवर भर देण्यात आला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक आणि नागरी संरक्षण दलाच्या जवानांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे समाजाचा कणा असलेल्या सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी यात भाग घेतला. महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्यासह 'आपदा मित्र' आणि 'आपदा सखी' यांनी या सरावात सक्रिय सहभाग नोंदविला.

नागरिकांनी आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता 'प्रथम प्रतिसादक' (First Responder) म्हणून कसे काम करावे, यासाठी हे प्रशिक्षण निश्चितच उपयुक्त ठरेल. १५ एप्रिलपर्यंत ही मोहीम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कळविले आहे. भविष्यातील कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाशी लढण्यासाठी नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक अधिक सजग,सक्षम होण्यास हा उपक्रम सहाय्यकारी ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande