
नागपूर,06 एप्रिल (हिं.स.) : विदर्भात शिवसेनेची अनेक रोपटी उगवली होती, पण योग्य देखभालीच्या अभावामुळे ती सुकली. आता मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही विदर्भात शिवसेना पुन्हा उभी करू असे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरूपम यांनी केले. ते आज, सोमवारी नागपूरच्या प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी निरूपम म्हणाले की, भाजप मित्रपक्ष आहे, आव्हान नाही. भाजप आपल्या मित्रपक्षांना संपवते हा आरोप खोटा आहे. बिहारमधील नितीश कुमार यांचे उदाहरण समोर आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना निरुपम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी उठाव केला. पक्ष फुटतो तेव्हा पक्षप्रमुख तो सावरण्याचा प्रयत्न करतो, पण उद्धव ठाकरेंनी तसे केले का ? निवडणुकांमध्ये शिंदे राज्यभर फिरत असताना ठाकरे कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुंबईतील दोन-तीन खासदार सोडले तर उरलेले सर्व खासदार आणि बहुतांश आमदार आमच्या संपर्कात असल्याचे निरुपम म्हणाले.
अशोक खरात प्रकरणी ते म्हणाले की, राजकारणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात बाबांना भेटतात, पण त्यांच्या बंद खोलीतील कृत्यांचे समर्थन करत नाहीत. एकनाथ शिंदे यांना खरातचे कारनामे माहित असते तर त्यांनी त्याला कधीच तुरुंगात पाठवले असते असे स्पष्टीकरण निरुपम यांनी दिले. तसेच अंजली दमानिया यांनी कोणाच्या तरी हातातले बाहुले बनून मोठ्या नेत्यांविरुद्ध आपला वापर होऊ देऊ नये असा सल्ला देखील त्यांनी दिला.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी