
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
देशभरातील रक्तपेढ्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीत रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 'ई-रक्तकोष' पोर्टल अनिवार्य केले आहे.सीडीएससीओच्या या निर्णयामुळे आता रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब डिजिटल स्वरुपात उपलब्ध असेल. रक्ताचा काळाबाजार रोखण्यासोबतच रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण थांबविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.केवळ पोर्टलवर माहिती भरून चालणार नाही, तर 'ड्रग इन्स्पेक्टर' (औषध निरीक्षक) अचानक तपासणी करतील. पोर्टलवर दिसणारा आकडा आणि फ्रीजमध्ये असलेला प्रत्यक्ष रक्ताचा साठा यांची काटेकोर पडताळणी केली जाईल.रक्तदानाची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी आता रक्तदात्यांची माहिती 'आभा आयडी' आणि 'आधार'शी जोडली जाणार आहे. यामुळे एकाच दात्याने वारंवार (नियमबाह्य) केलेले रक्तदान किंवा आरोग्य इतिहास शोधणे सोपे होईल.पोर्टलवरील डेटामध्ये फेरफार आढळला किंवा साठ्याबाबत चुकीची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले, तर संबंधित रक्तपेढीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये दंड किंवा परवाना रद्द करण्याच्या तरतुदीचा समावेश आहे.या पोर्टलमुळे सर्वसामान्यांना आपल्या जवळच्या रक्तपेढीत कोणत्या गटाचे रक्त किती उपलब्ध आहे, याची माहिती मोबाइलवर एका क्लिकवर मिळेल. यामुळे रक्तासाठी एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये धावपळ करण्याची गरज उरणार नाही.
पोर्टलवर मिळते ही माहिती
रक्ताच्या विविध गटांचा (ए, बी, एसबी, ओ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह) रिअल - टाइम साठा. जवळच्या शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांची यादी व पत्ता, कॅम्प (रक्तदान शिबिर) आणि दात्यांची उपलब्धता, रक्ताचे घटक यांचा साठा.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी