अमरावतीत सिलेंडर टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे चुल पेटवून आंदोलन
-तिवसात चुलीवर भाकरी आंदोलन; तहसीलदारांना भाकर-कांदा भेट अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.) | आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर होत असून, त्याचे पडसाद आता अमरावती जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात घरगुती
सिलेंडर टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे चुल पेटवून आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी


-तिवसात चुलीवर भाकरी आंदोलन; तहसीलदारांना भाकर-कांदा भेट

अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.) | आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातील इंधन पुरवठ्यावर होत असून, त्याचे पडसाद आता अमरावती जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुल पेटवून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

सिलेंडरच्या टंचाईमुळे स्वयंपाकासारख्या दैनंदिन गरजांवर परिणाम होत असून, विशेषतः महिला व कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही परिस्थिती गंभीर बनत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.“सामान्य नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत आणि पुरवठा सुरळीत करावा,” अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान, या आंदोलनामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत पुढील उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे.

तिवसात चुलीवर भाकरी आंदोलन; तहसीलदारांना भाकर-कांदा भेट

तिवसा येथे गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करून अनोखे आंदोलन करण्यात आले. “सिलेंडर कब मिलेगा” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती वापरासह हॉटेल, चहा टपऱ्या व मेस व्यवसायावर परिणाम झाला असून नागरिकांना वाढीव दराचा फटका बसत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.

राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला प्रतिसाद देत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारांना भाकर व कांदा भेट देऊन निषेध नोंदविण्यात आला. युवा आघाडीचे सागर भवते यांनी तालुक्यातील कृत्रिम टंचाई व काळाबाजार तात्काळ थांबविण्याची मागणी केली. अन्यथा सिलेंडर गोडाऊनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande