
सिव्हिल सर्जन मंत्र्यांकडे कार्यरत, पगार मात्र रायगडमधून; महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची वरिष्ठ पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने संपूर्ण यंत्रणा ‘रामभरोसे’ चालत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाणारी जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन), जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी ही तिन्ही महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. या पदांचा तात्पुरता कार्यभार अधिकाऱ्यांकडे सोपवून केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. निशीकांत पाटील यांच्याकडे असून, जिल्हा आरोग्य अधिकारी व क्षयरोग अधिकारी पदांचा कारभार डॉ. प्राची नेहुलकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, नियमित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवमाने यांची दोन वर्षांपूर्वी आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्ती झाली असतानाही त्यांच्या जागी अद्याप नवीन अधिकारी नेमण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, ते मंत्रालयात कार्यरत असतानाही त्यांचे वेतन रायगड जिल्ह्यातूनच काढले जात असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकारी नसल्याने निर्णयप्रक्रिया मंदावली असून प्रशासनावर ताण वाढला आहे. याचा थेट फटका रुग्णसेवेला बसत आहे. रिक्त पदे तात्काळ भरून काढावीत आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन ठोस पावले उचलणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)