प्राचीन वटवृक्ष वाचवण्यासाठी काही महिला चढल्या झाडावर
वृक्षप्रेमी विरुद्ध स्थानिक नागरिकात संघर्ष नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.) - पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी विरोध धुडकावत शहरात सर्वत्र बेसुमार वृक्षतोड सुरू असून याचे पडसाद सोमवारी गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्षा
Some-women-climbed-the


वृक्षप्रेमी विरुद्ध स्थानिक नागरिकात संघर्ष

नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.)

- पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी विरोध धुडकावत शहरात सर्वत्र बेसुमार वृक्षतोड सुरू असून याचे पडसाद सोमवारी गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्षांच्या फांद्या छाटताना उमटले. सकाळपासून वृक्षप्रेमींनी वटवृक्षाच्या पायथ्याशी ठाण मांडून, काहींनी झाडावर चढून त्यास विरोध दर्शविला.तर रस्त्यावरील झाडांमुळे अपघात होत असून ती हटविण्याच्या मागणीसाठी काही स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. दोन्ही गट आमनेसामने आल्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी वृक्षप्रेमींना ताब्यात घेतल्यानंतर वटवृक्षाच्या फांद्या छाटण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील वृक्षतोडीचा विषय राष्ट्रीय हरित लवादात प्रलंबित असताना महापालिकेकडून रस्ते, पूल बांधणी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा अनेक कामांसाठी वृक्ष तोडले जात आहेत.

आठवडाभरात वेगवेगळ्या भागात त्यास कमालीचा वे आल्याचे चित्र असून सुमारे चार ते पाच हजार झाडे तोडली जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष तोडले जात असल्याचे समजल्यावर सोमवारी सकाळी वृक्षप्रेमी आनंदवल्ली – गंगापूर गाव दरम्यानच्या संबंधित वटवृक्षाच्या ठिकाणी जमले. अमित कुलकर्णी, प्रवीण शिलावट यांनी या वटवृक्षाखाली ठाण मांडून आंदोलन सुरू केले.

काही युवती वटवृक्ष वाचविण्याचे फलक घेऊन झाडावर चढल्या. महापालिकेच्या कार्यपद्धतीचा निषेध करीत संबंधितांकडून घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी वृक्षप्रेमी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाले. न्यायालयाचे फायकस प्रजातीची झाडे तोडू नयेत, हे आदेश महापालिकेने धाब्यावर बसवले. राजकीय लोकांच्या दबावाखाली अमानुषपणे वृक्षतोड होत असून पोलिसांनी त्यांना मदत केल्याची तक्रार शीतल गोळे-आडके, आदिती पटेल यांच्यासह अनेक वृक्षप्रेमींनी केली.

स्थानिकांची झाडे हटवण्याची मागणी

गंगापूर रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असून झाडांमुळे वाहतुकीला अडथळे येतात, अपघात होतात. त्यामुळे ज्या झाडांमुळे अपघात होतात ती हटवावी, अशी मागणी आम्ही सातत्याने केल्याचे कुसुम जाधव व जिजाबाई केदार यांनी सांगितले. रस्त्यावरील अडथळे, अडचणी दूर करण्यासाठी ही झाडे काढणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande