
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : गॅस सिलिंडर वितरणावरचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आता महानगर गॅस कंपनीकडून पीएनजीच्या (पाइप्ड नॅचरल गॅस) नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी नगरपालिकेच्या क्षेत्रातील ज्या भागात गॅस पाइपलाइनचे जाळे विस्तारले आहे, अशा ठिकाणी नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी आदेश दिले आहेत. येत्या १८ एप्रिलपर्यंत शहराच्या विविध भागात ही मोहीम राबविली जाणार आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी प्रभागांनुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार ७ एप्रिल रोजी ओसवाल नगर आणि एकता मार्ग येथील नागरिकांसाठी ओसवाल नगर सोसायटी हॉलमध्ये सुविधा करण्यात आली आहे. ८ आणि ९ एप्रिलला उद्यमनगर व पडवेकर कॉलनी, राजपूरकर कॉलनी, पटवर्धनवाडी परिसरातील रहिवाशांसाठी बाळासाहेब ठाकरे हॉल (पटवर्धनवाडी देवळेकर पेट्रोल पंपमागे) येथे नोंदणी करता येईल. नाचणे रोड परिसरासाठी १० एप्रिल रोजी दैवज्ञ भवन येथे तर हिंदू कॉलनी भागासाठी ११ एप्रिल रोजी शिवतेज हॉल, विश्वनगर येथे नोंदणी केली जाईल. १३ आणि १४ एप्रिल रोजी मारुती मंदिर, माळनाका, थिबापॅलेस रोड परिसरासाठी जयेश मंगल कार्यालय येथे अधिकारी उपस्थित राहतील. १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांत टिळक आळी, झाडगाव आणि सुभाष रोड, जोशी पाळंद, खालची आळी, वरची आळी, काँग्रेसभवन परिसरातील नागरिक वैद्य मंगल कार्यालय येथे नोंदणी करू शकतील. १८ एप्रिल रोजी कोकणनगर, क्रांतीनगर, राजनगर व नवाबनगर परिसरासाठी कोकणनगरातील उर्दू शाळेत नोंदणी करता येईल.या सर्व ठिकाणी सकाळी निश्चित केलेल्या वेळेत पालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी