
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)। सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांची शिदोरी, त्यांच्या कार्याची उंची आणि त्यांनी दिलेली मूल्ये प्रत्येक क्षणी सोबत आहेत. या स्मृती स्थळासमोर उभे राहताच त्यांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्या. जनतेसाठी झटणारा एक निस्वार्थ लोकनेता, निर्णयक्षमतेत कणखर आणि माणुसकीत मृदू असे त्यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. दादांनी आयुष्यभर जपलेली ही ओळखच आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी घालून दिलेला जनसेवेचा मार्ग आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हीच माझ्यासाठी दिशा आणि शक्ती आहे. आज त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी नवा ध्यास, नवी उमेद आणि नवी ऊर्जा मिळाली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा निर्धार आणखी दृढ झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु