
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.) लातूर शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण व व्यापारी दृष्टीने गजबजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच व्यापारी, शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात सविस्तर व व्यापक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांच्या अडचणीचे निवारण केले.यावेळी बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, सचिव चंद्रकांत पाटील, सर्व सभासद,विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक व्यापारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.
लातूरची बाजारपेठ ही सर्वात जुनी बाजारपेठ असून येथे दररोज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू होतात. विशेषतः पहाटे 5.00 ते सकाळी 8.00 या कालावधीत हजारो शेतकरी, व्यापारी व ग्राहक एकाच वेळी बाजारात दाखल होत असल्याने परिसरात प्रचंड गर्दी निर्माण होते. परिणामी वाहतूक कोंडी, गोंधळ, पार्किंगची समस्या तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विविध अडचणी निर्माण होत असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.या अनुषंगाने वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या मानून गुल मार्केट ते शिवाजी मार्केट गेट या मार्गावरील रहदारीचे नियोजन करण्यावर विशेष भर देण्यात येईल. रहदारीचे शिस्तबद्ध नियमन करण्यात येणार असून वाहनांच्या प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे, ठराविक वेळेनुसार वाहनांची आवक-जावक नियंत्रित करणे, गर्दीच्या वेळेत वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करणे तसेच आवश्यक तेथे तात्पुरते निर्बंध लागू करणे याबाबत संबंधित अधिकारी यांना सुस्पष्ट निर्देश देण्यात आले.तसेच बाजार परिसरात व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर होणारे अतिक्रमण ही गंभीर बाब असल्याचे निदर्शनास आले. यामुळे रहदारीत अडथळे निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या समन्वयाने विशेष मोहिम राबवून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार असून यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल. अतिक्रमणाविरोधात सातत्यपूर्ण व कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बैठकीत बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करून परिसर गुन्हेमुक्त करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय बाजार परिसरात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेणे, आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करणे तसेच चोरी प्रतिबंधासाठी प्रभावी यंत्रणा उभी करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विशेष चर्चा करण्यात आली असून बाजार परिसरात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस गस्त, संवेदनशील ठिकाणी विशेष देखरेख, आवश्यकतेनुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच छेडछाड व इतर गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित, सुलभ व सुव्यवस्थित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी बाजार परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात येणार असून अतिरिक्त पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवून नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, मार्केट परिसरातील सर्व समस्या अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात असून त्यावर तातडीने व परिणामकारक उपाययोजना करण्यात येतील. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे मार्फतीने बाजार समिती तसेच मार्केट परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व समितीमार्फत खाजगी सुरक्षा रक्षक यांची नियुक्ती करावी जेणेकरून बाजार परिसरातील सर्व अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी मदत होईल असे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर यांना आवाहन केले आहे. या बैठकीमुळे मार्केट परिसरातील विविध समस्या सोडविण्यासाठी ठोस दिशा मिळाली असून व्यापारी, शेतकरी व नागरिकांमध्ये विश्वास व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशा समन्वय बैठकीद्वारे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रभावी व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis