
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणार्या काही रेल्वे गाड्यांच्या धावणीत तात्पुरते बदल करण्यात आले असून हे बदल दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत चन्नासांड्रा येथील यार्ड पुनर्रचना कामांमुळे लागू करण्यात आले आहेत. चन्नासांड्रा यार्ड येथे सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील पुनर्रचना कामांसाठी पूर्व-अंतर्गुंफण व अंतर्गुंफण बंद कालावधी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 12 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 दरम्यान 17 दिवस पूर्व-अंतर्गुंफण कामे, तर 29 एप्रिल ते 02 मे 2026 या कालावधीत 4 दिवस अंतर्गुंफण बंद कालावधी राहणार आहे.
या कालावधीत केएसआर बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेस (गाडी क्रमांक 16593) या गाडीचा मार्ग तात्पुरता बदलण्यात आला असून ती 15 एप्रिल 2026 ते 02 मे 2026 या कालावधीत यशवंतपूर-यलहंका मार्गे धावेल. त्यामुळे बेंगळुरू कॅन्टोनमेंट स्थानकावरील या गाडीचा थांबा या काळात रद्द राहणार आहे. त्याचबरोबर ही गाडी केएसआर बेंगळुरू येथून सुमारे 75 मिनिटे उशिराने सुटणार आहे.
दरम्यान, नांदेड-केएसआर बेंगळुरू एक्सप्रेस (गाडी क्रमांक 16594) या गाडीच्या धावणीतही विलंब होणार असून 12 एप्रिल तसेच 15 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत सुमारे 120 मिनिटांचा विलंब अपेक्षित आहे. 13 व 14 एप्रिल रोजी हा विलंब सुमारे 150 मिनिटांचा राहणार आहे, तर 01 व 02 मे 2026 रोजी सुमारे 240 मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis