
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.) : महिला व बालविकास विभाग, रायगड जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हे जनजागृती अभियान ८ ते २८ मार्चदरम्यान उत्साहात राबविण्यात आले.या अभियानाअंतर्गत कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात ४० पथनाट्य आणि चित्ररथाद्वारे व्यापक जनजागृती करण्यात आली.
अभियानात गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्या, स्त्री-पुरुष समानता, किशोरवयीन मुलींचे शारीरिक व मानसिक बदल, समुपदेशन, मासिक पाळीबाबतचे गैरसमज, सुरक्षितता तसेच एचपीव्ही लसीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. याशिवाय संबंधित कायदे, शिक्षा आणि विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
अलिबाग, पेण, पनवेल, उरण, सुधागड आणि रोहा या तालुक्यांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या अभियानास जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील तसेच विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
कलारंग संस्थेच्या कलाकारांनी प्रभावी सादरीकरण करत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली. संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
-------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)