रत्नागिरी : कोल्हापूरच्या पर्यटकाचा संगमेश्वरच्या सोनवी नदीत बुडून मृत्यू
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : कोल्हापूरहून आलेल्या अजित शंकर बोरगे (वय ३७, रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) या पर्यटकाचा संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीत बुडून मृत्यू झाला. संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित बोरग
संग्रहित लोगो


रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : कोल्हापूरहून आलेल्या अजित शंकर बोरगे (वय ३७, रा. राजारामपुरी, शाहूनगर, १३ वी गल्ली, कोल्हापूर) या पर्यटकाचा संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदीत बुडून मृत्यू झाला.

संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित बोरगे आपले मावसभाऊ विनोद मोहन कलकुटकी (वय ४४) आणि इतर मित्रांसह टाटा सुमो ग्रँड (क्र. MH-10 AM-2270) गाडीने संगमेश्वर येथील मित्र सागरच्या आजोळी फिरण्यासाठी आले होते. नदीकिनारी आल्यानंतर मित्रांनी जेवणाची जय्यत तयारी केली होती. सोबत आणलेले जेवण नदीपात्राशेजारीच चुलीवर शिजत ठेवले होते. जेवण तयार होईपर्यंत एक फेरफटका मारून पोहण्याचा आनंद घेऊ, कडक उन्हाळा असल्याने दुपारच्या वेळी थंडावा मिळवू, या उद्देशाने सर्व मित्र लोवले येथील सोनवी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अजित बोरगे नदीच्या पात्रात खोलवर बुडू लागला.

त्याला वाचवण्यासाठी मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने संगमेश्वर येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉ. मुळ्ये यांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे पोहोचेपर्यंत अजित बोरगे यांचा मृत्यू झाला.विनोद मोहन कलकुटकी यांनी दिलेल्या खबरीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande