
नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.)।
‘काला हा समतेसाठी आहे. काल्याच्या कीर्तनातून एकात्मता जपली जाते आणि जातीयता संपुष्टात येते. काल्याच्या कीर्तनाचा लाभ शुद्ध झालेल्या जीवाला मिळतो. शुद्ध झालेला जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य म्हणजे काला असल्याचे विचार संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.
पंचवटीतील अमृतधाम परिसरा तील बी. डी. कामगार नगर, चिरंजीव दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता डॉ . गुट्टे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. ते म्हणाले की, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रांगत असताना आणि गायी चारत असतानाच चरित्र वर्णन करण्याची मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनालाही काही मर्यादा आहेत. वैकुंठालाही दुर्लभ असलेला काला मृत्युलोकात होत असतो, हे आपल्या दृष्टीने परम भाग्य आहे.माणसाचे जीवन उत्तम प्रकारे जावे, यासाठी मन ईश्वराकडे लावावे. त्यामुळे आपल्या कार्याला गती मिळते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला अद्भुत आहेत. त्यांचे चरित्र वर्णन करावे, मात्र आचरण प्रभू रामचंद्राच्या चरित्राचे करावे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम आहेत. भगवान श्रीकृष्णाचे तत्त्व अंगीकारावे आणि प्रभू रामचंद्राचे आचरण स्वीकारावे, म्हणजे जीवनात सुख-शांती नांदते.या प्रसंगी नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेवक रिद्धेश निमसे, जयवंत जेजुरकर तसेच चिरंजीव दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोंदू बाबांच्या नादी लागू नका
कोणत्याही भोंदू बाबांच्या नादी लागू नका असे आवाहन डॉ. गुट्टे महाराज यांनी केले. ‘म्हणोनी शरण जावे, सर्व भावे देवाशी’ असे संतांनी सांगितले. ‘कंठी धरिला कृष्ण मनी, अवघा जनी प्रकाश’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरही विविध दाखले देत डॉ गुट्टे महाराज यांनी निरूपण केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV