
परभणी, 06 एप्रिल (हिं.स.)।
मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात निर्माण झालेल्या स्वयंपाक गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार 6 एप्रिल रोजी येथील आंदोलन मैदानावर लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष मनोहर वाकळे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, शिवाजी वाकळे, महासचिव मुजफ्फरखान, महासचिव अनिल राठोड, शहराध्यक्ष मुदसिर असरार आदींच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन, रोजगार व उपजीविका यावर मोठा परिणाम झाला असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले. अकोला येथील सरपंच शंकरराव शिरसाठ तसेच अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाचा सिलेंडर मिळविण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाल्याच्या घटनांचा उल्लेख करत ही परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यभरात गॅस टंचाई निर्माण झाल्याने स्वयंपाक घरातील गॅसशेगड्या थंड पडल्या असून नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करून दिवस काढावे लागत आहेत. चहाच्या टपर्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते तसेच गॅसवर चालणारी वाहने यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक शहरांमध्ये हॉटेलमधील पदार्थांची विक्री बंद झाली असून लग्नसमारंभ, घरगुती व धार्मिक कार्यक्रम, तसेच जेवण व्यवस्था करणार्या व्यवसायांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रम पुढे ढकलावे लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परभणी शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला असून मेसमध्ये गॅसअभावी जेवण बंद झाल्याने अनेक विद्यार्थी गावाकडे परतल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनीही मोर्चा काढून या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शहरात काही ठिकाणी गॅस सिलेंडर पाच ते सात हजार रुपयांना मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तात्काळ थांबवावी, काळाबाजार रोखावा, साठेबाजी करणार्यांवर कठोर कारवाई करावी, 25 दिवसांनंतर होणारी नोंदणी व्यवस्था रद्द करावी, विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक स्वयंपाक केंद्र सुरू करावे, तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा सविस्तर लेखाजोखा सादर करावा, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis