
डोंबिवली, 06 एप्रिल (हिं.स.)। एमआयडीसी येथील महिलांचा सायकल सखी ग्रुप हा सामाजिक, पर्यावरण, आरोग्य हे उद्दिष्ट ठेवून अनेक विविध कार्यक्रम करीत असतात. दरवर्षी ह्या ग्रुपच्या महिला आणि काही पुरुष मंडळी सायकलने पंढरपूर आषाडीवारीसाठी जात असतात. पावसाळ्यात वृक्षारोपण करणे, स्वच्छता, पाणी, आरोग्य याबाबत जागृतीसाठी शिबीर, प्रचारफेरी काढणे, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणे असे अनेक सामाजिक उपक्रम त्या करीत आहेत. लहान मुले, महिला यांना सायकल चालविण्याचे धडे देत आहेत.
या सायकल सखी ग्रुपच्या महिलांना पंढरपूर आषाडीवारी जायचे वेध लागले असून 1 एप्रिल ते 30 जून असे तीन महिने रोज 20 ते 30 किलोमीटर सराव त्या करणार आहेत. याच ग्रुप मधील एक धाडशी सायकलिस्ट योगिता थोटांगे ( 43 वर्षे ) हिने सरावासाठी कर्जत जवळील प्रति पंढरपूर - आळंदी येथे रविवारी 5 एप्रिल रोजी जाऊन येऊन अंदाजे 120 किलोमीटर अंतर यशस्वीपणे पूर्ण केले. तिच्या सोबत डोंबिवली येथील प्रशांत विसपुते (62वर्षे ) हे होते. शिवाय याच दिवशी ठाणे-मुंबई येथील एमडीव्ही MDV सायकलिस्ट ग्रुप हा ठाणे-ऐरोली येथून निघून प्रति पंढरपूर - आळंदी येथे आले होते.
योगिता थोटांगे व प्रशांत विसपुते हे पण त्यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आले होते. याच एमडीव्ही ग्रुप मधील सायकलिंग व रनिंगचा युट्युब द्वारे प्रसार करणारे श्री महेश दाभोळकर तसेच श्री परिचित पाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ही सायकल राईड रविवारी पहाटे पाच वाजता निघून एकूण सहा तास चाळीस मिनिटात जाऊन येऊन पूर्ण केली. याच ग्रुपमधील 73 वर्षाचे अनिल सहस्त्रबुद्धे यानी त्यांच्या जिद्दीने आणि अनुभवाने सर्वांना प्रेरणा दिली.
योगिता थोटांगे यानी यापूर्वी पुणे सायक्लोथॉन, बोईसर ते जव्हार क्लासिक, मालेगाव सायकलिंग क्लब तर्फे तीस दिवसात 600 किमी, खोपोली - रायगड 108 किमी ( Raigadh Expedition ), हुतात्मा सायकलिंग चॅलेंज - सातारा 800 किमी, महाराष्ट्र सायकल सखी - शिवजयंती सायकलिंग स्पर्धा अमरावती इत्यादी अशा सायकल राईड व स्पर्धेत भाग घेऊन एकूण पन्नासहुन अधिक पदके, स्मृतिचिन्ह मिळवली आहेत. कॅन्सर मुलांच्या मदतीसाठी 899 किलोमीटर कॅन्सर राईड ही त्यानी नुकतीच डिसेंबर/जानेवारी पूर्ण केली आहे.
योगिता थोटांगे या डोंबिवली एमआयडीसी मधील सायकल सखी ग्रुपच्या क्रियाशील सभासद असून आपला ब्युटीपार्लर व्यवसाय सांभाळून सायकलची आवड जोपासत आहेत आणि सामाजिक कार्य करीत आहेत. याच सायकल सखी ग्रुपच्या संस्थापिका आणि अध्यक्षा सौ सुवर्णा राणे ( 63 वर्षे ) आणि ज्येष्ठ सभासद वर्षा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला या सायकलिंग व फिटनेस राखण्याच्या उद्देशाने व त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी कार्यरत आहेत.
--------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi