
मुंबई, 06 एप्रिल (हिं.स.) : हवामान बदलामुळे कोकणात आंबा व काजूच्या झाल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने देऊ केलेली सरासरी प्रति झाड १०० ते २०० रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हेक्टरी किमान दोन लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्ष व कोकण जन विकास समितीने केली आहे.
आंबा व काजू पिकाच्या झालेल्या नुकसानीबद्दल हेक्टरी २२ हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. हेक्टरी आंब्याची किमान १०० झाडे बसतात (सघन लागवड असल्यास बरीच जास्त) तर काजूची २१५ ते २२० झाडे बसतात. या हिशेबाने विचार केल्यास राज्य सरकारने प्रति झाड आंब्याला २२५ रुपये तर काजूला शंभर रुपये मदत देऊ केली आहे. ही मदत तुटपुंजी असून झाडामागे मिळू शकणाऱ्या उत्पन्नाच्या दहा टक्केही नसल्याचे जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कोकण संघटक सचिव संजय परब, जिल्हाध्यक्ष जगदीश नलावडे तसेच कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, दिनेश राणे, प्रशांत गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारने १९९५- ९६ च्या सुमारास प्रथमच आंबा पिकाचे नुकसान झाल्याबद्दल कोकणातील शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर केले होती. हेक्टरी १०० कलमे धरल्यास शेतकऱ्यांना झाडामागे शंभर रुपये मिळाले होते. आज तब्बल ३० वर्षाच्या कालखंडानंतर सरकार दोनशे सव्वादोनशे रुपये मदत देत असेल तर ती शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मशागतीचा खर्चही यातून सुटणार नाही.
काजूसाठी तर झाडा मागे अवघे १०० रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत. काजू हे नगदी पीक असून देशाला मोठ्या प्रमाणात परकी चलन मिळवून देणारे आहे. शेतकरी नाउमेद होऊ नये यासाठी सरकारने हेक्टरी किमान दोन लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्ष तसेच व कोकण जनविकास समितीच्या माध्यमातून या सर्वांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी