
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : जिल्ह्यातील ज्या वाड्या, वस्त्यात, गावात पाणीटंचाई आहे, तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या टँकर सुरू करण्याचा एकही प्रस्ताव आलेला नाही. टंचाईचा प्रस्ताव आल्यास त्या त्या तालुक्यात पाणी टँकर सुरू केले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.
दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवत असते. यंदा मार्चमध्येच पाणीटंचाईस सुरुवात झाली आहे. चिपळूण, लांज्यासह इतर तालुक्यांत पाणीटंचाईच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, टँकरविषयी सौ. रानडे यांना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, ज्या तालुक्यात टँकरची मागणी येईल त्याठिकणी तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जलजीवन मिशनची कामे निधीअभावी रखडलेली आहेत. बहुतांश कामे झालेली आहेत. काही कामे अंतिम टप्प्यावर आली आहेत. ७० ते ९० कोटींचा निधी येणे अपेक्षित आहे. अद्याप निधी आलेला नाही. निधी आल्यास कामे सुरू होऊन कामांना वेग येईल.
शिक्षकांच्या जनगणनेसंदर्भात अद्याप तरी कोणतेही पत्रक शिक्षण विभागाला आलेले नाही. पत्रक आल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही रानडे यांनी सांगितले.
रत्नगिरी जिल्ह्यात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) ही लस महाग असून तिचा तुटवडा आहे. जिल्ह्यासाठी १० हजार ६०० लशी प्राप्त झाल्या आहेत. या लसीबाबत अफवा पसरवण्यात येत आहेत. १४ वर्षे वयोगटातील मुलींनी ही लस घ्यावी, ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी पालकांनी मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनामार्फत ही लस मोफत देण्यात येते, असेही रानडे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी