
रत्नागिरी, 6 एप्रिल (हिं. स.) : चिपळूण आणि खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज कंपनी आणि तिच्या पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात आज स्थानिक नागरिकांनी जोरदार मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले.या मोर्चादरम्यान आंदोलकांनी स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका करत कंपनीविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंपनीपासून सुमारे 500 मीटर अंतरावर मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मोर्चात महिला, युवक, शेतकरी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.आंदोलकांनी घातक रसायनांच्या उत्पादनावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली. पर्यावरण आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करणारे प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी