
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : मेळघाटातील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा गडगा मध्यम प्रकल्प सध्या अर्धवट अवस्थेत असून, त्याच्याशी संबंधित पुरक प्रकल्पांवर मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू असल्याने या संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूळ गडगा मध्यम प्रकल्पाचे काम संबंधित कंत्राटदार कंपनी ‘एफ. ए. कन्स्ट्रक्शन’ने अर्ध्यावर सोडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आले असून, जोपर्यंत मुख्य प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत इतर कामांवर होणारा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेळघाटात हरितक्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे स्वप्न स्थानिक नेते व शेतकऱ्यांनी पाहिले होते. दहा वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला गती देत माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मुख्य कामच अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेची प्रतीक्षा कायम आहे.
दरम्यान, या प्रकल्पाशी संलग्न ४२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत फिल्टर प्लांट, विहिरी, पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच सिंचनासाठीही मोठ्या प्रमाणात पाईपलाईन उभारली जात आहे.
मात्र, मुख्य प्रकल्पच अपूर्ण असल्याने या पुरक प्रकल्पांचे भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांकडून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम प्रीतिपालसिंह नागपूर या कंपनीकडून केले जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित केली जात असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर संबंधित विभाग व कंत्राटदारांच्या कामकाजाची वास्तव स्थिती समोर येण्याची शक्यता आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी