
बीड, 07 एप्रिल (हिं.स.)।अंबाजोगाई शहराच्या नागरी पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या ७५ लाख १ हजार २७६ रुपयांच्या विविध विकासकामांना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक प्रलंबित नागरी कामांचा मार्ग मोकळा झाला असून प्रभाग क्रमांक ४ आणि ८ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार नमिता मुंदडा आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी या विकासकामांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेने सादर केलेल्या या प्रस्तावामुळे शहराच्या नियोजित विकास आराखड्यास गती मिळणार आहे.
या योजनेसाठी बीड जिल्ह्याकरिता एकूण ३५ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी अंबाजोगाई नगरपरिषदेला लोकसंख्येच्या प्रमाणात ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, ज्यातील ७५ लाखांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना ही मंजुरी मिळाली आहे. या मंजूर निधीतून अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील माळी नगर भागात गणेश राऊत ते उंबरकर आणि अर्जुन वाघमारे ते शिनगारे अशा विविध अंतरांवरील सीसी नाली व सीसी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील प्रशांत नगर भागात परशुराम मेहता ते बाळासाहेब इखे यांच्या घरापर्यंत सीसी रोड आणि नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. नागरी सुविधांसोबतच प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर दुसऱ्या मजल्यावर नवीन हॉलचे बांधकामही या निधीतून प्रस्तावित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या सर्व कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगरपरिषद अंबाजोगाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis