अंबाजोगाईच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात सुवर्णझेप; दोन सुवर्णपदकांसह तेजल बडेचे ‘ यश
बीड, 07 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील चोपणवाडी येथील कन्या तेजल मनोरमा ज्ञानेश्वर बडे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक
अ


बीड, 07 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील चोपणवाडी येथील कन्या तेजल मनोरमा ज्ञानेश्वर बडे हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करताना तेजलने नेत्ररोगशास्त्र (Ophthalmology) आणि औषधशास्त्र (Pharmacology) या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयांत सुवर्णपदके पटकावून जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे. एका सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील मुलीने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तेजलच्या या ऐतिहासिक यशाची दखल घेत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे तसेच कॅबिनेट मंत्री निलेश राणे यांच्या हस्ते तिचा आणि तिच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला. एका पोलीस अधिकारी आणि आरोग्य सेवेतील परिचारिकेच्या कन्येने मिळवलेल्या या यशामुळे बडे कुटुंबाची मान अभिमानाने उंचावली आहे. तेजलचे वडील ज्ञानेश्वर बडे हे सध्या बीड पोलीस दलात सहायक फौजदार म्हणून कार्यरत असून, तिची आई मनोरमा बडे या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 'इंचार्ज सिस्टर' म्हणून रुग्णसेवा बजावत आहेत. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत तेजलने हे यश संपादन केले आहे.

तेजलचे शालेय शिक्षण अंबाजोगाईच्या नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेत झाले आहे. बालपणापासूनच ती अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि तिने अनेक स्पर्धांमध्ये आपले नैपुण्य सिद्ध केले होते. विशेष म्हणजे, सातवीत असताना तिने अबॅकस स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले होते. त्या वेळी तिच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला होता. शालेय जीवनापासूनच यशाची परंपरा जोपासणाऱ्या तेजलने आता वैद्यकीय क्षेत्रातही आपली मोहोर उमटवली आहे.

आपल्या यशाबद्दल बोलताना तेजलने या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांनी घेतलेले अपार कष्ट, त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. ग्रामीण भागातील मुलांनी जर जिद्द ठेवली तर ते कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, असे तिने या वेळी आवर्जून नमूद केले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande