बीड विमानतळाच्या कामाला गती; तांत्रिक सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण
बीड, 07 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्हावासीयांचे स्वतःच्या विमानतळाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या दिशेने वेगाने पाऊल पडत आहे. विमानतळ उभारणीसाठी अत्यंत आवश्यक असलेले ''ओएलएस'' म्हणजेच तांत्रिक सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी वि
बीड विमानतळाच्या कामाला गती; तांत्रिक सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण


बीड, 07 एप्रिल, (हिं.स.)। बीड जिल्हावासीयांचे स्वतःच्या विमानतळाचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या दिशेने वेगाने पाऊल पडत आहे. विमानतळ उभारणीसाठी अत्यंत आवश्यक असलेले 'ओएलएस' म्हणजेच तांत्रिक सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या महत्त्वपूर्ण टप्प्याची अधिकृत घोषणा केली आहे. पार पडलेल्या या सर्वेक्षणाद्वारे विमानतळ परिसरातील तांत्रिक अडथळ्यांचे अचूक मापन आणि विश्लेषण करण्यात आले आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बीड तालुक्यातील कामखेडा, दगडी शहाजानपूर आणि आहेर चिंचोली या तीन गावांतील सुमारे ३०८ हेक्टर खासगी आणि ११७ हेक्टर शासकीय जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारणाऱ्या या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष विमानतळ उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून बीडकरांच्या विमान प्रवासाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande