अमरावतीत रस्ता रुंदीकरणासाठी १४० कडूनिंबांच्या झाडांची कत्तल
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा–अमरावती महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या शेकडो वर्ष जुन्या कडुनिंबाच्या झाडांच्या तोडीला सुरुवात झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाने परवानगी दिल्यानंतर देवमाळी ग्रामपंच
हिरव्यागार १४० कडूनिंब झाडांची कत्तल सुरू परतवाडा - अमरावती रस्त्याचे रुंदीकरण


अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : परतवाडा–अमरावती महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या शेकडो वर्ष जुन्या कडुनिंबाच्या झाडांच्या तोडीला सुरुवात झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाने परवानगी दिल्यानंतर देवमाळी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सुमारे १४० झाडांची कत्तल सोमवारपासून सुरू झाली आहे.

परतवाडा ते चांदूरबाजार नाक्यापर्यंतच्या मार्गावर एकूण सुमारे ३०० कडुनिंबाची झाडे रुंदीकरणासाठी अडथळा ठरत होती. यापैकी अचलपूर नगर परिषद हद्दीत १५० झाडे असून, देवमाळी ग्रामपंचायत हद्दीत १४० झाडांचा समावेश आहे. देवमाळी हद्दीतील झाडे तोडण्यास वन विभागाने मंजुरी दिल्याने सध्या त्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे, तर अचलपूर नगर परिषद हद्दीतील झाडांना अद्याप परवानगी मिळालेली नाही.

सकाळी ८ वाजल्यापासूनच यंत्रणेद्वारे सुरू असलेल्या या वृक्षतोडीमुळे अनेक वर्षांपासून उभे असलेले, इंग्रजकालीन वारसा असलेले हिरवेगार वृक्ष डोळ्यादेखत नाहीसे होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी या निर्णयाचा निषेध नोंदवत पर्यावरणाच्या हानीबद्दल चिंता व्यक्त केली.

खंडवा–अमरावती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम २०१७ पासून वन विभागाच्या परवानगीअभावी रखडले होते. आता परवानगी मिळाल्यानंतर कामाला वेग आला असला तरी वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, आदिवासी पर्यावरण रक्षा संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक असले तरी झाडे तोडण्यापूर्वी त्यांची पर्यायी लागवड करणे गरजेचे होते. जागतिक तापमान वाढत असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणे अत्यंत चिंताजनक आहे.”

महामार्गाच्या विकासासाठी वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी पर्यावरण रक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande