सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; ऑनलाईन प्रणालीतील त्रुटींमुळे संताप
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या सातबारा उतारा मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये वारंवार ‘एरर’ येत असल्याने सेतू केंद्रांचे कामकाज ठप्प झाले असून, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सा
शासनाच्या सातबारा संकेतस्थळावर व्यत्यय शेतकर्यांचा संताप वाढला


अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या सातबारा उतारा मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये वारंवार ‘एरर’ येत असल्याने सेतू केंद्रांचे कामकाज ठप्प झाले असून, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

सातबारा उतारा कर्ज भरणे तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अत्यावश्यक कागदपत्र असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने सेतू केंद्रांकडे धाव घेत आहेत. मात्र, संबंधित संकेतस्थळ व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे तासन्तास प्रतीक्षा करूनही त्यांना उतारा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

दरम्यान, सेतू केंद्र चालकांनाही या तांत्रिक अडचणींचा फटका बसत असून, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच सामोरे जावे लागत आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असली तरी सिस्टम सतत डाऊन राहत असल्याने काम करणे अशक्य झाल्याची प्रतिक्रिया दर्यापूर येथील सेतू चालकांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर महसूल व आयटी विभागाने तातडीने लक्ष देऊन संकेतस्थळातील त्रुटी दूर कराव्यात आणि सेतू केंद्रांवरील सेवा सुरळीत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. “ऑनलाईन सेवा नावालाच, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची फरफट” अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande