
अमरावती, 07 एप्रिल : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत फिल्ड ट्रेनर्सच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी श्रीमती वर्षा लढ्ढा यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी योगेश पिठे, जनगणना संचालनालयाचे जिल्हा समन्वयक ऋषिकेश पाथरे, सहायक अभियंता अजय विंचुरकर (मास्टर ट्रेनर), सहायक शहर जनगणना अधिकारी अक्षय निलंगे तसेच नंदकिशोर तिखीले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, मनोज शहाळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी जनगणनेचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहे.
शासनाच्या विविध योजना, धोरणे आणि संसाधनांचे नियोजन हे अचूक जनगणना माहितीवर अवलंबून असते, त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक व जबाबदारीने पार पाडणे अत्यावश्यक आहे.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना त्यांनी फिल्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांच्या माध्यमातून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना योग्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याने, प्रत्येक बाब सखोलपणे समजून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तांत्रिक प्रक्रिया, डेटा संकलनातील अचूकता आणि वेळेचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपायुक्त योगेश पिठे यांनी प्रस्ताविकातून प्रशिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आगामी जनगणना यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत अचूक माहिती पोहोचवणे हे मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास कुलट यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सागर अठोर, प्रतीक खिराडे आणि अक्षय महल्ले यांनी सहकार्य केले. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात जनगणनेचे विविध टप्पे, माहिती संकलन पद्धती, डिजिटल साधनांचा वापर तसेच क्षेत्रीय अडचणींवर उपाय याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी