
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसू लागला असून, सायकलसारख्या साध्या वाहनाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे सायकल निर्मिती खर्च वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत दरवाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलाद, ऍल्युमिनियम आणि रबराच्या किमती वाढल्यामुळे सायकल तयार करण्याचा खर्च तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढला आहे. सायकलच्या फ्रेमसाठी लागणारे लोखंड व पोलाद तसेच हँडल आणि रिमसाठी लागणाऱ्या ऍल्युमिनियमच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय पेंट आणि रासायनिक प्रक्रियेचा खर्चही वाढला आहे.
अमरावती शहरात दरमहा सुमारे हजारांहून अधिक सायकलींची विक्री होत असते. शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग आणि फिटनेससाठी सायकल वापरणारे नागरिक हे प्रमुख ग्राहक आहेत. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या दरवाढीमुळे नवीन खरेदीच्या चौकशीत १० ते १५ टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सायकलच्या टायर-ट्यूबसाठी लागणाऱ्या रबराच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, टायर-ट्यूबच्या दरात प्रतिजोड २०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्पेअर पार्ट्सही महागले आहेत.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे गेल्या काही महिन्यांत सायकलकडे पर्यायी वाहन म्हणून पाहण्याचा कल वाढला होता. ऑफिसला जाणे किंवा दैनंदिन कामांसाठी ‘विनाइंधन’ पर्याय म्हणून अनेकांनी सायकलचा वापर सुरू केला आहे.
दरम्यान, वाढते प्रदूषण आणि आरोग्याबाबतची जागरूकता यामुळे शहरात सायकलिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिमऐवजी मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी तरुणाई सायकलिंगकडे वळत असून, महागड्या सायकलींनाही आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणून स्वीकारले जात आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी