
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार, आता बारावीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतही शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची मुभा मिळणार आहे.
यापूर्वी वार्षिक परीक्षा संपताच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडावे लागत असे. परिणामी, एमएचटी-सीईटी, नीट आणि जेईई सारख्या महत्त्वाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शहरात महागड्या भाड्याच्या खोली घेऊन राहावे लागत होते. मात्र आता, हा निर्णय ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयीचा ठरला आहे.
नियम व अटी
विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या शिस्तीचे पालन करणे अनिवार्य आहे.
विनाकारण बाहेर फिरणाऱ्या किंवा अभ्यासात रस नसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
सुट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी ठेवली जाईल.
वसतिगृहातील मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी.
ही सवलत १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, विशेषतः जे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी तयारी करतात.
जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत ६ मुलींसाठी आणि ३ मुलांसाठी असे एकूण २ शासकीय मागासवर्गीय वसतिगृहे आहेत, जिथे प्रत्येक वसतिगृहात ७५ ते १०० विद्यार्थी निवासी असतात.
प्रवेशाचे नियम
ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीत राहायचे आहे, त्यांना महाविद्यालय किंवा कोचिंग क्लासचे ओळखपत्र तसेच स्पर्धा परीक्षेचा अर्ज सादर करावा लागेल.
विद्यार्थ्यांची वर्तणूक आणि उपस्थिती पाहूनच वसतिगृह अधीक्षक राहण्याची परवानगी देतील.
सुट्ट्यांतही शासकीय हॉस्टेलमध्ये राहण्याची मुभा मिळाल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली नाही, त्यांना शैक्षणिक सत्राच्या शेवटपर्यंत आणि स्पर्धा परीक्षा संपेपर्यंत वसतिगृहात राहता येईल. प्रशासनाने याबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत.------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी