
छत्रपती संभाजीनगर, 07 एप्रिल (हिं.स.)। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपली कार्यपद्धती सुधारावी, अशा शब्दांत आमदार विलास भुमरे यांनी तहसील कार्यालयातील बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले.
'मुख्यमंत्री बळिराजा शेत पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक गावांमधील रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याचे समोर येताच, आमदार भुमरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. 'बेकायदेशीर बांधकामे आणि कुंपणांमुळे शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात. या योजनेमुळे गावांमध्ये पारदर्शकता येईल आणि वाद कमी होतील,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीला उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, अक्षय जायभाय, राजेंद्र वाघमोडे, मनोज गायके, नंदू पठाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis