दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने रेल्वे चढताना खाली पडलेल्या एका प्रवाशाला जीव धोक्यात घालून वाचविले आहे. ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व उल्लेखनीय कार्य
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी


नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने रेल्वे चढताना खाली पडलेल्या एका प्रवाशाला जीव धोक्यात घालून वाचविले आहे. ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व उल्लेखनीय कार्य करत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

हेड कॉन्स्टेबल मोगरे पद्माकर हे परभणी रेल्वे स्थानकावर गुन्हे प्रतिबंधक कर्तव्य बजावत असताना गाडी क्रमांक १२७८८ नागरसोल-नरसापूर एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली होती.

यावेळी जनरल डब्यात प्रवासी चढत असताना एक प्रवासी अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. ही घटना लक्षात येताच मोगरे पद्माकर यांनी अत्यंत तत्परता व धाडस दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला आणि संभाव्य दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद असे असून ते परभणी ते नांदेड असा प्रवास करत होते.

दुसऱ्या घटनेत, सौ. अविषा, राहणार पुणे, या आपल्या पतीसोबत गाडी क्रमांक १७६२९ हडपसर एक्सप्रेसने पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथे उतरताना त्यांनी चुकून आपली पर्स गाडीतच विसरली. पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर तक्रार नोंदवली. मिळालेल्या संदेशानुसार शिवानंद मांते यांनी सेलू रेल्वे स्थानकावर संबंधित डब्याची तपासणी केली आणि पर्स शोधून काढली.

रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करून सेलू येथील रेल्वे पोलिस चौकीत बोलावण्यात आले आणि पर्स सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आली. सदर पर्समध्ये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, अॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड व बँकेची कार्डे होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande