अमरावती - अकोला महामार्गावर भीषण अपघात; ४ तरुणांचा मृत्यू
अमरावती, 07 एप्रिल, (हिं.स.)। अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा विमानतळाजवळ ही हृदयद्रावक घटन
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात;  चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू


अमरावती, 07 एप्रिल, (हिं.स.)। अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा विमानतळाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, अपघातात प्राण गमावलेले चारही तरुण बडनेरा जुनी वस्ती येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील सात युवक मध्यरात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. चहा घेऊन परतत असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडच्या झाडावर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतकांत मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६, रा. बडनेरा जुनी वस्ती) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती) यांचा समावेश असल्याची माहिती बडनेरा पोलिसांनी दिली.

या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

या अपघातातील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर सतत उपचार करत आहेत. एकाच भागातील चार तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने बडनेऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघाताची नोंद केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande