
बीड, 08 एप्रिल, (हिं.स.)। पाटोदा शहर व पंचक्रोशीतील भाविकांसाठी येत्या १० एप्रिल २०२६ रोजी एक अद्वितीय आध्यात्मिक पर्व साकारत असून अवधूत परंपरेतील सिद्ध महायोगी दादा गुरु भगवान यांच्या आगमनाची जय्यत तयारी शहरात सुरू आहे. या दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे आमदार सुरेश धस यांनी स्वतः या सोहळ्याच्या नियोजना संदर्भात बारकाव्यांनी लक्ष घातले असून ते स्वतः देखील या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्यामुळे पाटोदा शहरात या सोहळ्याची अतिशय भव्यदिव्य जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सलग सहा वर्षे निराहार राहून केवळ जलप्राशनावर जीवन व्यतीत करणारे दादा गुरु भगवान यांचे जीवन हे विज्ञानालाही न उलगडलेले कोडे मानले जात आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमदार सुरेश धस हे आवर्जून उपस्थित राहणार असून ह.भ.प. हरिहरानंद सरस्वती महाराज, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज, ह.भ.प. सतीश उरणकर
महाराज, ह.भ.प. राधाताई आई साहेब महाराज यांच्यासह परिसरातील विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, दादा गुरु भगवान यांच्या नर्मदा परिक्रमा यात्रेदरम्यान पाटोदा येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज सस्ते यांचा त्यांच्याशी संपर्क आला होता. त्या माध्यमातून निर्माण झालेल्या आध्यात्मिक नात्यामुळेच तसेच स्थानिक भाविकांच्या आग्रहासह आमदार सुरेश धस यांच्या विनंतीवरून दादा गुरु भगवान यांनी पाटोदा भेटीस मान्यता दिल्याची माहिती आयोजकांनी दिली. चाऊस मंगल कार्यालय येथे हा मुख्य कार्यक्रम पार पडणार असून पाटोदा ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis