
परभणी, 08 एप्रिल (हिं.स.) : पाथरी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील नीमतानदार रामेश्वर गुरुलिंगप्पा बिडकर यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडी (ता. पाथरी) येथील 63 वर्षीय तक्रारदार यांच्या पुतण्याच्या शेतजमिनीच्या पुनर्मोजणीसंदर्भात बिडकर यांनी सुरुवातीला 15 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तडजोडीनंतर त्यांनी 12 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानुसार बुधवारी (दि. 8 एप्रिल 2026) सापळा रचण्यात आला. पाथरी येथील साई मंदिर रोडवरील एका दुकानासमोर बिडकर यांनी तक्रारदाराकडून 8 हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात अटक केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करीत आहेत. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis