
सोलापूर, 08 एप्रिल (हिं.स.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर साजरा करण्यात येणाऱ्या “सामाजिक समता सप्ताह”चा सोलापूर येथील कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. सहाय्यक समाज कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत विविध सामाजिक, जागरूकता आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय, विशेष सहाय्य योजना, जात वैधता प्रमाणपत्र तसेच ॲट्रॉसिटी संदर्भातील विषयांमध्ये गती आणण्याची गरज व्यक्त केली. उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतीही भेट देण्यात आल्या.
सात दिवस चालणाऱ्या या समता सप्ताहात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व व निबंध स्पर्धा, लोकनाट्य व लघुनाटिका स्पर्धा, तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभवितरणाचा समावेश आहे.
याशिवाय समता दूतांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी त्यांच्या कार्यावर व्याख्यान व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 14 एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांना अभिवादन व शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्यावर विशेष व्याख्यान होणार आहे.
सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन सादर केले. यावेळी विविध अधिकारी, कर्मचारी, समतादूत व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश पुजारी यांनी मानले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड